

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील गौर येथे बंद घराचा दरवाजा तोडून २ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.३०) रात्री उशिरा पिंपळगाव लिखा रोडजवळ घडली. याप्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पूर्णा तालुक्यातील गौर येथे बुधवारी रात्री गावातील विद्यूतपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे येथील त्र्यंबकराव जोगदंड हे घराला कुलूप लावून गावाबाहेर नवीन बांधकाम सुरू असलेल्या त्यांच्या घरात झोपायला गेले होते. यादरम्यान घरात कोणी नसल्याचा व अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील १ लाख ८० हजार रुपये नगदी रोकड, सोन्याची बाळी, नवीन साड्या असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. पहाटे जोगदंड घरी आले असता त्यांना घराचे कडी-कोयंडा तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर, जमादार वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.