

आळते : येथील बसस्थानकाजवळील डॉ. रफीक मुजावर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने 15 तोळे सोन्याचे दागिने, पाऊण किलो चांदी व दीड लाख रुपये असा 12 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी भरदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रफीक मुजावर हे सकाळी माले येथे दवाखान्याकडे गेले होते. त्यांच्या पत्नी शबनम मुजावर या घर बंद करून गावातील आपल्या मेडिकलमध्ये गेल्या. या मुदतीत चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दुसर्या मजल्यावर असलेल्या चार खोल्यांमधील लाकडी कपाटे व लोखंडी तिजोरी फोडून चार तोळ्यांच्या बांगड्या, पोहे हार, दोन गंठण, दहा अंगठ्या, एक तोळ्याची चेन, दोन तोळ्याच्या गोठसह चांदी व रोख रकमेवर डल्ला मारला. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास शबनम मुजावर मेडिकल दुकान बंद करून घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घटनास्थळी हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांनी धाव घेऊन माहिती घेतली. या ठिकाणी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान परिसरातच घुटमळले.
या महिन्यातील आळते गावातील ही पाचवी घरफोडी असून, यापूर्वी परिसरात दिवसा एकेठिकाणी व एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनासमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.