

Parbhani Road work completed by the system without government funds
जिल्ह्यातील शासकीय खात्यांमधील भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली, याचे उदाहरण म्हणजे काम न करता लाखोंचा निधी खर्च दाखवणे आणि त्यावरून कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड होणे. अशा भ्रष्ट पध्द-तीने बदनाम झालेल्या तथाकथित 'परभणी पॅटर्न'ला आव्हान देत पेडगाव ग्रामस्थांनी एक अभिनव आणि प्रेरणादायी 'पेडगाव पॅटर्न' निर्माण केला. यामुळे संबंधित यंत्रणेला कुठलाही शासकीय निधी, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश काहीच नसतानाही ग्रामस्थांच्या दबावामुळे स्वखचनि रस्त्याचे काम करावे लागले.
तालुक्यातील पेडगाव फाटा ते पेडगाव रेल्वे स्थानक आणि पुढे जांबपर्यंत जाणार्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत असलेल्या भागात याआधी सुमारे ६ कोटी रुपये खर्चुन पूर्ण झाले होते. मात्र त्याच रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत अजून ४६ लाखांचा निधी दोन वर्षांपूर्वी खर्च दाखविण्यात आला. पण प्रत्यक्षात रस्त्यावर काहीच काम झाले नव्हते.
या प्रकारानंतर पेडगाव ग्रामपंचायतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांनी प्रत्यक्ष पालकमंत्र्यांसमोर हा भ्रष्टाचार उघड केला. जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर ४६ लाखांचा निधी कामाविना खर्च झाला याची कबुली दिली.
ग्रामस्थांनी रास्ता रोकोसारखे आंदोलन उभे करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. आंदोलन दिवशीच जिल्हा परिषद यंत्रणेने कोणतीही प्रशासकीय मान्यता किंवा आदेश न घेता तात्काळ काम सुरू केले. विशेष बाब म्हणजे या कामासाठी शासकीय निधी मंजूरच नव्हता, तरीही काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, हा खर्च कोणाच्या खिशातून गेला? या कामासाठी खाजगीरित्या निधी उभारण्यात आला की कोणत्यातरी गुप्त फंडातून रक्कम वापरली? याची माहिती ग्रामस्थांना अद्याप मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना संतोष देशमुख म्हणाले, आज काम झाले, पण उद्या याच कामासाठी परत एखादा निधी टाकून तो हडप करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही गप्प बसणार नाहीत.