

Parbhani 10 quintal bhaji bhakri
पूर्णा: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पूर्णा तालुक्यातील मुंबर येथून मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य रवाना करण्यात आले. ३१ ऑगस्टच्या रात्री गावकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दहा क्विंटल भाजी, भाकरी, पोळ्या, लोणचे आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून टेम्पोमार्फत मुंबईतील आंदोलकांकडे पाठवले.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या उपोषणस्थळी उपहारगृहे बंद पाडल्याने आंदोलकांना अन्नपाण्याची अडचण निर्माण झाली होती. मात्र, या गोष्टीची माहिती होताच राज्यातील अनेक गावांमधून भाजी-भाकरी, शिधा आणि पाणी पुरवठ्याचा ओघ मुंबईकडे सुरू झाला.
मुंबरमध्ये सकल मराठा बांधवांनी ठराव घेऊन प्रत्येक घरातून भाकरी, पोळ्या, सुकी भाजी व लोणचे देण्याचे ठरवले. गावातील महिलांनी रविवारी सकाळपासून उत्साहाने स्वयंपाक करून मोठ्या प्रमाणावर खाद्यसामग्री जमा केली. सायंकाळी मराठा सेवकांच्या माध्यमातून हे सर्व अन्नधान्य मुंबईकडे रवाना करण्यात आले. याच धर्तीवर ताडकळस व खुजडा गावांमधूनही खाद्यसामग्रीची रवानगी झाली.
दरम्यान, मुंबईत दानशूर व्यक्तींसह ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी अन्नछत्र सुरू केले असून, आंदोलकांची गैरसोय दूर झाली आहे. एवढेच नव्हे तर सध्या ठिकठिकाणी अन्नधान्य मुबलक प्रमाणात जमा झाले असून काही ठिकाणी ते उरत असल्याचेही दिसून येत आहे.
मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा जीआर लागू होईपर्यंत आणि ते आरक्षण हक्काने मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. त्यामुळे पुढील काही काळ आंदोलकांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी गावोगावी मराठा बांधवांचा सहकार्याचा हात पुढे सरसावला आहे.