गंगाखेड : चांगेफळ (तालुका पूर्णा) गावातील गट क्र.६८ मधील जालना-नांदेड समृद्धी महामार्गावरील मंजूर झालेला संपादित शेत जमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनचे नुकसान भरपाईच्या कामासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अमोल खेडकर याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.१) परभणीच्या 'एसीबी'ने रंगेहाथ अटक केली. तर त्याचा साथीदार खाजगी इसम दादाराव गडगिळे याचा शोध सुरू आहे. प्रकरणी सायंकाळी उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, पूर्णा तालुक्यातील चांगेफळ येथील एका ५५ वर्षीय फिर्यादीने उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड येथील महसूल सहाय्यक अमोल बालाजी खेडकर व खाजगी इसम दादाराव गडगिळे (रा.चांगेफळ तालुका पुर्णा) या दोघांनी ३० सप्टेंबर रोजी मंजूर झालेला संपादित शेत जमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनचे नुकसान भरपाईचे कामासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी तडजोडी अंती ५० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. त्यानुसार आज (मंगळवारी) ५० हजाराची लाच स्विकारताना महसूल सहाय्यक अधिकाऱ्याला 'एसीबी'ने रंगेहाथ अटक केली. तर त्याचा साथीदार खाजगी इसम दादाराव गडगिळे याचा शोध सुरू आहे. नांदेड एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक (एसीबी) परभणी अशोक इप्पर यांनी एसीबीच्या पथकासह ही कारवाई केली.
दरम्यान मंगळवारी दुपारी गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात 'एसीबी'च्या पडलेल्या छाप्याने जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ माजली होती. एसीबीच्या छाप्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. जिल्हाभरातून महसूल विभागात घडलेल्या 'ट्रॅप' ची जोरदार चर्चा सुरू होती.