

पूर्णा : तालुक्यात मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टीचा जोर कायम असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रात्रदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आधीच्या दुबार पावसामुळे बाधित झालेली खरीप पिके आता पुन्हा नव्या संततधारेमुळे पाण्याखाली गेली आहेत.
सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यासह उभी पिके शेतात पाणी साचल्याने वाफसाच होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाया गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर निराशेचे सावट गडद झाले आहे.
महसूल खात्याच्या आकडेवारीनुसार, जुलै-ऑगस्ट महिन्यात विविध मंडळांमध्ये रेकॉर्ड पाऊस झाला आहे. पूर्णा महसूल मंडळात २७ जुलैला ८६.२५ मिमी, १७ ऑगस्टला ६६.२५ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. ताडकळस मंडळात १५ ऑगस्ट रोजी तब्बल १९४.५० मिमी पाऊस झाला. लिमला, कात्नेश्वर, चुडावा व कावलगाव मंडळातही जुलै-ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदले गेले आहे.
सध्या देखील आकाश ढगांनी भरलेले असून पावसाच्या सरी सुरूच आहेत. त्यामुळे खरीप हंगाम हातचा जात असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नैसर्गिक आपत्ती ट्रिगर बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी हप्ते भरूनही नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याने शासनाच्या मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.