

Parbhani rain agriculture News
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी जमिनीत अल्पशी ओल असताना केलेली धूळपेरणी बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे कामाला आली असून पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे, तर पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला असून वरुणराजाने पेरते व्हा असा संदेश बळीराजाला दिला आहे. खरिपाच्या पेरणीत मात्र हवामानतज्ञांचे पावसा संदर्भातले अंदाज वरुणराजाने फेल ठरवले आहेत.
जिल्ह्यात जवळपास २ लाख ८२ हजार ७०८ हेक्टरवर शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. जमिनीत अल्पशी ओल असताना पेरणी करून शेतकरी पावसाची वाट पाहत असताना वरुणराजाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अनेकांनी उगवलेले कोंब जगविण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर केला होता, परंतु केवळ पावसाच्या पाण्याबर अवलंबून असलेल्या शेतकरीवर्गाचे डोळे आभाळाकडे लागले होते. पेरणी केलेले पिके पाण्या अभावी हातून जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला. बुधवारी सायंकाळपासुन १९.९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जून अखेरीस ६६.४ मि.मि. पाऊस झाला आहे.
बुधवारी झालेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले असून पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात २ लाख ८२ हजार ७०८ हेक्टरवर सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी तर कपाशीची लागवड झाली आहे. सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ५४ हजार ५४ हेक्टर होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ११ हजार ९५४ होते. त्यापैकी १ लाख २२ हजार २२९ हेक्टरवर लागवड झाली आहे. तूर पिकाचे प्रस्तावित क्षेत्र ४२ हजार ६०२ हेक्टर होते. त्यापैकी १६ हजार ११९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मूग पिकाचे प्रस्तावित क्षेत्र १७ हजार ६०० हेक्टर होते. त्यापैकी २ हजार ६०७हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे प्रस्तावित क्षेत्र ६ हजार ४१३ हेक्टर होते. त्यापैकी ८५९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
हवामान तज्ञांनी पावसाबाबत व्यक्त केलेले अंदाज फेल ठरले आहेत. बुधवारी सायंकाळी वरुणराजाने जिल्हाभर सर्वदूर हजेरी लावत हवामान तज्ञांचे अंदाज फेल ठरवत शेतकऱ्यांना मात्र दिलासा दिला आहे. जिल्ह्यात आजतागायत ६६.४ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे.