

पूर्णा : पांगरा ढोणे (ता. पूर्णा) येथे मागील दोन दिवसांपासून पिसाट आणि मुजोर कुत्र्यांनी शेतातील गोठ्यांमध्ये बांधलेल्या गोवंश वासरांवर हल्ला करून सात वासरांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत.
गावातील पिंपळा लोखंडे रोडलगत गट क्रमांक २२ येथे शेतकरी श्यामराव ढोणे यांच्या जागेवर काही दिवसांपासून मुजीब कुरेशी या व्यक्तीने विनापरवाना कोंबडी मांस विक्रीचे दुकान सुरू केले आहे. या दुकानातील टाकावू मांस खुले फेकले जात असल्याने गावातील काही भटक्या आणि काही पाळीव कुत्र्यांचे टोळके येथे गोळा होऊ लागले. हे कुत्रे टाकावू मांस खाऊन अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी शेजारील शेतांमध्ये जाऊन गोठ्यात बांधलेल्या वासरांवर हल्ले सुरू केले आहेत.
गेल्या दोन दिवसांत या कुत्र्यांनी सात गोवंश वासरांचा फडशा पाडला असून, काही वासरे गंभीर जखमी झाली आहेत. या हल्ल्यांमध्ये दोन वासरांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या कुत्र्यांनी विश्वनाथ पांचाळ, शंकर ढोणे, ज्ञानोबा ढोणे, शेषराव ढोणे, बापूराव ढोणे तसेच पिंपळा लोखंडे येथील काही शेतकऱ्यांच्या वासरांना लक्ष्य केले आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पांगरा ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार आणि चुडावा पोलीस ठाणे येथे २६ जून रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी विनापरवाना मांस विक्रीचे दुकान त्वरित हटवावे, नुकसान भरपाई द्यावी आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
या पिसाट कुत्र्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, पिंपळा येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हे कुत्रे रस्त्यात अडवून चावण्यासाठी धावत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पांगरा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.