

Purna Panchayat Samiti News
पूर्णा: पूर्णा तालुक्यातील चुडावा, एरंडेश्वर, कावलगाव, वझूर, ताडकळस आणि गौर या सहा जिल्हा परिषद गटांसह त्याअंतर्गत येणाऱ्या बारा पंचायत समिती गण सदस्यपदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळत असून, मागील काही दिवसांपासून एकच धावपळ सुरू आहे.
यशवंत सेना, उबाठा शिवसेना, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप या प्रमुख राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी सक्रिय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत गौर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोमल देसाई–पारवे, एरंडेश्वरमधून भाजपच्या स्मिता संजय कदम, दादाराव चापके (भाजपा), वझूरमधून यशवंत सेनेच्या उर्मिला मारोती बनसोडे तसेच एरंडेश्वरमधून उबाठा शिवसेनेचे रितेश काळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच विविध पंचायत समिती गणांतूनही अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
ता. १९ जानेवारी रोजी गौर जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी देसाई व श्रीधर पारवे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोमल देसाई–पारवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर ता. २० जानेवारी रोजी कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीत एरंडेश्वर येथून उबाठा शिवसेनेचे रितेश काळे, वझूर येथून यशवंत सेनेच्या उर्मिला मारोती बनसोडे आणि एरंडेश्वरसाठी भाजपच्या स्मिता संजय कदम यांनी अर्ज दाखल करून निवडणुकीत चुरस वाढवली.
दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ता. २१ जानेवारी रोजी भाजपचे भरत घनदाट, दादाराव चापके, काँग्रेसचे नारायण चापके तसेच सैनाजी माठे, नरेश जोगदंड, डिगांबर कऱ्हाळे, संदीप ढगे, बालाजी खैरे, कपील देसाई, विलास गिरी, उत्तमराव ढोणे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, १६ ते २० जानेवारी या कालावधीत अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षांच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी यशवंत सेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच उबाठा शिवसेना–काँग्रेस यांच्यात युती होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अशी लढत उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युती प्रत्यक्षात झाली, तर स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या व आधीच अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. युतीबाबतचा अंतिम निर्णय येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.