

Bike Collision Gangakhed Road Accident
सोनपेठ : गंगाखेड रोडवरील सायखेडा शिवारात गणपती मंदिराजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि. १७ ) सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात २४ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
खडका येथून शेळगावकडे जाणारी बुलेट (क्रमांक एम.एच. २२ ए.जे. ५७३०) आणि शेळगावहून खडक्याकडे येणारी दुचाकी (क्रमांक एम.एच. ३८ एच. ९७४६) यांची सायखेडा शिवारात जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात खडका येथील महेश अशोक यादव (वय २४) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या दुर्घटनेत अतुल रामेश्वर यादव, सोमनाथ जोगदंड (वय ४०, रा. शेळगाव) आणि सुभाष पंचागे (वय ३८, रा. शेळगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर गंगाखेड–सोनपेठ मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनेची माहिती मिळताच पोउपनि अजय किरकन, पोलीस अंमलदार राजेश मस्के व कुंडलिक वंजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.