

Purna Savkar Killed Case
पूर्णा : पूर्णा शहरातील गुड मॉर्निंग रोडवरील हिरो शोरूमसमोर शुक्रवारी (दि. २२) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सावकार देवराव बैजाजी साखरे यांचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. सकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी मृताचे पुत्र बैजाजी देवराव साखरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात गणेश चांदोजी घोरपडे, रमेश पिराजी घोरपडे, पाराजी तुळशीराम घोरपडे, चांदोजी तुळशीराम घोरपडे, सुरज पाराजी घोरपडे व इतर रहिवासी कोळी गल्ली, पूर्णा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात जुन्या शेती वादातून आरोपींनी संगनमत करून हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून देवराव साखरे यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सपोनि जायभाये व पथकाने तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी रमेश घोरपडे आणि गणेश घोरपडे यांना ताब्यात घेत अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कसून तपास करत आहे.