

Parbhani Purna Railway Station Childbirth
पूर्णा: डॉक्टर हे देवाचे रूप मानले जाते, याची प्रचिती पूर्णा रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेतून पुन्हा आली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या राजस्थानमधील एका गर्भवती महिलेची प्रसूती चक्क रेल्वेच्या डब्यात झाली. या वेळी रेल्वे दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल करवंदे यांनी तत्परतेने मदत करत सुखरूप बाळंतपण केले.
शुक्रवारी (दि.१२) सकाळी साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास भगतकीकोठी-पूर्णा गाडी पूर्णा स्थानकात दाखल होत असताना या गाडीतील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती लक्षात येताच गाडी स्थानकावर थांबवून रेल्वे दवाखान्याचे अधिकारी डॉ. करवंदे यांना तातडीने बोलावण्यात आले.
डॉ. करवंदे यांनी महिलेला तपासले असता प्रसूती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेला हॉस्पिटलमध्ये हलविण्याइतका वेळ नसल्याने डब्ब्यातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नातेवाईकांची परवानगी घेऊन काही मिनिटांत डब्बा रिकामा करून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर डॉ. करवंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षितरीत्या प्रसूती पूर्ण केली. काही वेळातच त्या महिलेला कन्यारत्न झाले.
बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती सध्या उत्तम असून त्यांना नातेवाईकांकडे सुखरूप सोपविण्यात आले आहे. डॉ. कपिल करवंदे यांच्या वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे प्रसूती सुखरूप झाली. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.