

Parbhani Constitution Desecration Case
परभणी : काही महिन्यांपूर्वी राज्याला हादरवून टाकणार्या शहरात दि.10 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार यांनी मिर्झापूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना सोमवारी (दि.12) सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा हे संवेदनशील प्रकरण चर्चेत आले आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मांडण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची दि.10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. पुढे याचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले होते. या दंगलीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता.
या प्रकरणात पोलिसांनी तालुक्यातील मिर्झापूर येथील दत्ता सोपान पवार यांना मुख्य आरोपी म्हणून अटक केली होती. दंगलीनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर धरपकड केली होती. अनेकांना कारागृहात डांबण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास अनेक महिने सुरू होता. न्यायालयीन सुनावणीअंती दत्ता पवार यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र त्याच्यासाठी जामीन रक्कम भरण्यास कोणीही पुढे न आल्याने ते बराच काळ कारागृहातच होते.
अखेर दि.8 जानेवारी रोजी न्यायालयाने स्वतःहून पुढाकार घेत दत्ता पवार यांची जामिनावर सुटका कण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी मिर्झापूर येथे नेऊन सोडले होते. जामिनावर सुटून चार दिवस उलटत नाहीत, तोच सोमवारी (दि.12) सकाळी 8 वाजेच्या सुमारास दत्ता पवार यांनी राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपविले.
विशेष म्हणजे दत्ता पवार हे आपल्या घरात एकटेच राहत असल्याचे गावातील नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर मागील अनेक महिन्यांपासून मानसिक उपचार सुरू होते. त्यात त्यांची पत्नी आणि मुल त्यांच्यापासून दूर राहत असल्याने घरी ते एकटेच असायचे. त्यांनी नेमकी कधी जीवन संपविले. याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
या घटनेनंतर मृतदेह परभणीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी देण्यात आला. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी तपासातून घेत आहेत. घटनास्थळाला ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, सुधीर डोंबे, जमादार शंकर हाके, शंकर जाधव आदींनी भेट दिली.