

Purna election updates
पूर्णा : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) पार पडलेली मतदान प्रक्रिया किरकोळ अडचणी वगळता सुरळीत पार पडली. ११ प्रभागांसाठी उभारलेल्या ३८ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. ठरलेल्या ५.३० नंतरही काही केंद्रांवर मतदार रांगेत असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच राहिले. वेळेत मतदान केंद्रात दाखल झालेल्या मतदारांना केंद्रप्रमुखांनी टोकन दिल्याने सर्वांनी आपला मताधिकार बजावला.
एकूण ३३,७७४ पैकी २३,७५५ मतदारांनी मतदान केल्याची अधिकृत नोंद असून, मतदानाचा टक्का ७०.३४ इतका नोंदवला गेला आहे. दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारा निकाल स्थगित ठेवण्यात आला असून आता निकाल २१ डिसेंबररोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी १४ आणि इतर पदांसाठी ११० असे मिळून एकूण १२४ उमेदवारांचे भवितव्य तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद ठेवण्यात आलेल्या ३८ ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. स्ट्राँग रूमला राज्य राखीव पोलीस दलासह स्थानिक पोलिसांचा २४ तास कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकाल उशीर झाल्याने मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता सध्या थोडी शमली आहे.
या निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रतिष्ठेचे प्रयत्न केले. खासदार, आमदारांच्या सभा, कॉर्नर मिटिंग्ज, रॅली, घर-दारी भेटी आणि लाऊडस्पीकरच्या प्रचारातून १ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराचा जोर कायम राहिला.
दरम्यान, काही उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘लक्ष्मीअस्त्र’ वापरल्याची चर्चा शहरात रंगत आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे. मतदानानंतर शहरात विविध बूथवरील परिस्थिती, कोणत्या उमेदवाराला किती मते मिळू शकतात याबाबत कार्यकर्ते आकडेमोड करत आहेत. तरीही, सर्वांच्या नजरा मतमोजणीकडे लागल्या आहेत.