

Purna Token holder voting
पूर्णा : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधील मतदान केंद्रावर वेळ संपल्यानंतरही मतदारांची मोठी गर्दी कायम राहिली. मंगळवारी (दि. २) सकाळी ७.३० पासून नगरपरिषदेच्या ११ प्रभागांसाठी ३८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली होती.
प्रभाग क्रमांक ९ हा ५०४७ इतक्या सर्वाधिक मतदारसंख्येचा असल्याने येथे एका नगराध्यक्षपदासह अ, ब आणि क अशा तीन उमेदवारांची निवड होत आहे. यासाठी केंद्रावर तीन स्वतंत्र ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली होती. मात्र, एवढ्या यंत्रांचा वापर कसा करायचा हे अनेक अशिक्षित आणि वयोवृद्ध मतदारांना लगेच समजत नसल्याने गोंधळ निर्माण झाला. मतदानाची पद्धत समजावून सांगताना वेळ खर्ची पडत होता.
याशिवाय, या प्रभागातील भय्यासाहेब आंबेडकर सभागृहातील केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने ते काही काळ बंद पडले. सुमारे २० मिनिटांनंतर मशीन दुरुस्त झाली, परंतु त्यामुळे मतदान प्रक्रियेत आणखी उशीर झाला. परिणामी, सायंकाळी साडेपाचची अधिकृत वेळ संपूनही केंद्रावर मतदारांची रांग तशीच कायम होती.
वेळ संपण्यापूर्वी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना अधिकाऱ्यांनी टोकन वाटले असून त्यांचे मतदान रात्री उशिरापर्यंत घेण्यात येणार आहे. वाढलेली गर्दी आणि मतदानास लागणारा वेळ यामुळे केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, निवडणूक अधिकारी प्रशांत थारकर यांनी केंद्राला भेट देत मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. रांगेतील एकही मतदार मताधिकारापासून वंचित राहू नये, याची त्यांनी विशेष खबरदारी घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.