

Purna Mategaon road mishap Youth killed
पूर्णा : अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी जाणारा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, तरुणाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही घटना शुक्रवारी (दि.५) सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास पूर्णा - माटेगाव रोडवर घडली. संतोष उर्फ छगन घोडजकर (रा. घोडज, ता. कंधार, जि. नांदेड) असे मृत युवकाचे नाव आहे.
या अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बिट जमादार अमर चाऊस यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील देगाव फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात संतोष घोडजकर आज सकाळी ७. ३० ते ८ च्यादरम्यान पायी चालत जात होता. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक देऊन चाकाखाली चिरडले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक पळून गेला.
ही माहिती पूर्णा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताची माहिती सोशल मीडियावर तत्काळ पाठवून मृताची ओळख पटवण्याचे काम केले. काही तासानंतर मृत युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या अपघात प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अमर चाऊस अधिक तपास करीत आहेत.