

Purna Kantheshwar Village House Fire Incident
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे शुक्रवारी (दि. ९) रात्री सुमारे १० वाजता शॉर्टसर्किटमुळे एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली असून अल्पभूधारक शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कंठेश्वर येथील अल्पभूधारक शेतकरी यशवंत सूर्यभान कदम यांच्या घरात रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घटनेच्या वेळी शेतकऱ्याची पत्नी व दोन मुले घरात झोपलेली होती. मात्र घरात अचानक आग भडकल्याचे लक्षात येताच सर्वजण घाबरून उठले व प्रसंगावधान राखत जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच गावातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, मुलांची शैक्षणिक कागदपत्रे, सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक मोबाईल फोन जळून खाक झाला.
या घटनेनंतर शेतकरी यशवंत कदम यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आला असून मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावासह परिसरात शेतकरी वर्गातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.