

Purna Hi-Tech Residential School owner couple police custody
पूर्णा: पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये घडलेल्या हभप हेंडगे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी संस्थाचालक दाम्पत्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या दाम्पत्याला पुणे परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर, त्यांची वैद्यकीय तपासणी परभणी येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर त्यांना पूर्णा पोलिस ठाण्यात आणून अटक दाखल करण्यात आली आणि न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
झिरोफाटा येथील हायटेक स्कूलमध्ये संस्थाचालक पती-पत्नीने पालकास जबर मारहाण केल्याने हभप हेंडगे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, एपीआय भारती, मुत्तेपोड, फौजदार परिहार, वाघमारे, पोअं चट्टे, केंद्रे, भुजबळ, विलास सातपुते, सावंत, कौटकर, रेड्डी यांनी संयुक्त तपास करून आरोपींना पुणे परिसरातून अटक केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे.
१० जुलै रोजी उखळद येथील किर्तनकार हभप जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी झिरोफाटा येथील हायटेक स्कूलमध्ये गेले होते. तेव्हा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हभप हेंडगे बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या तक्रारीवरून दोन्ही संस्थाचालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना घडल्यानंतर हे दांपत्य फरार झाले होते.