

Prabhakar Chavan Ratnamala Chavan Arrested in Pune
पूर्णा: तालुक्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमधील विद्यार्थिनीच्या पालकाच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या संस्थाचालक पती-पत्नीला अखेर पोलिसांनी पुणे परिसरातून अटक केली आहे. पालकाच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
१० जुलै रोजी उखळद येथील किर्तनकार हभप जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी झिरोफाटा येथील हायटेक स्कूलमध्ये गेले होते. तेव्हा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हभप हेंडगे बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या तक्रारीवरून दोन्ही संस्थाचालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना घडल्यानंतर हे दांपत्य फरार झाले होते.
या घटनेनंतर आरोपींना अटक करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (उबाठा गट) खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आवाज उठवला होता. तसेच, स्थानिक ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता.
परभणीचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे आणि पूर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सातत्याने तपास करत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर २१ जुलै रोजी पोलिसांना आरोपी पुणे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापेमारी करून पूर्णा आणि परभणी पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपींना पूर्णा पोलिस ठाण्यात आणण्यात येत आहे.
या अटकेमुळे पोलिसांवरील तणाव काहीसा कमी झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.