Parbhani flood news: हातातोंडाशी आलेलं पीक गेलं, आम्ही काय खायचं...; शेतकऱ्यांचा टाहो
गंगाखेड: गंगाखेडपासून दहा किलोमीटरवर असलेले मासोळी धरण वर्षानुवर्षे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आले आहे. पण यंदा मुसळधार पावसामुळे तेच धरण शेतकऱ्यांसाठी संकटाचे कारण बनले आहे. धरण परिसरात प्रचंड पाण्याची आवक झाल्याने तळ्याकाठच्या शेतांमध्ये पाणी साचले असून उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
धरणालगतच्या एका शेतकऱ्याच्या पाच एकरात कापूस व सोयाबीन पिके लहरत होती. परंतु आता शेतात पिकांच्या ऐवजी पाणीच पाणी दिसत आहे. कापसाला लागलेली ८० ते १०० बोंडे, तर सोयाबीनच्या शेंगा पाण्याखाली सडून गळून पडल्या.
आम्ही काय खायचं...शेतकरी हताश
“पेरणी, फवारणी, खुरपणी यासाठी दीड लाख खर्च केला. तीन लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते. विजयादशमीनंतर सोयाबीन काढणीसाठी मजुरांना पैसे दिले. दिवाळीनंतर कापूस वेचणी करायची होती. पण आता सर्व काही पाण्यात गेले. आम्ही काय खायचं?”
आता दिवाळीऐवजी अंधारच अंधार
शेतकऱ्यांनी सांगितले की, सतत पाण्यात राहिल्याने पिकांची मुळे उघडी पडली असून पुढील दोन दिवसांत उरलेले बोंडे व शेंगा उन्हाळून पडतील. त्यामुळे खर्चसुद्धा निघणार नाही. ज्या घरात दिवाळी उजळायची होती, तिथे आता उपासमारीची भीती व अंधार दाटून आला आहे. शासन पंचनामे करेल, पण आमचे अश्रू कोण पुसणार? असे भावनिक व्यक्त झाले.
घामाचा, स्वप्नांचा अन् मुलांच्या उपासमारीचा मोबदला कोण देणार?
मासोळी धरण परिसरात लातूर व बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी वाढत असून नदीकाठच्या गावांनाही पूराचा धोका निर्माण झाला आहे. वेदने व्याकूळ शेतकरी म्हणतोय की, नुकसानीच पंचनामा झाला तरी आमच्या घामाचा, आमच्या स्वप्नांचा आणि मुलांच्या उपासमारीचा मोबदला कोण देणार?असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

