

Purna Taluka Crop Damage
पूर्णा : यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या अल्पशा पावसावर भरवसा ठेवून पूर्णा तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, आता पावसाने दीर्घ उघडीप दिल्यामुळे हिरवेगार होणारे शिवार कोरडे पडू लागले आहे. अंकुरलेली सोयाबीन, मूग, उडीद आणि कापसाची कोवळी रोपटी उन्हाच्या तीव्रतेने सुकून वाळून चालली आहेत. तर अनेक भागात बियाणे जमिनीतच सडून गेल्याने उगवणच झालेली नाही. या प्रतिकूल परिस्थितीमुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाण्यांचे दर गगनाला भिडले होते. असे असतानाही शेतकऱ्यांनी पदरचे पैसे, उसनवारी आणि चढ्या व्याजाने कर्ज काढून खते व बियाण्यांची जुळवाजुळव केली होती. मृगाच्या सुरुवातीला पडलेल्या रिमझिम पावसावर आणि वेळेत पेरणी व्हावी या हेतूने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर दमदार पाऊस झालाच नाही. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरलेले बियाणे मातीतच नासून गेले आहे. यामुळे हजारो रुपयांचे बियाणे व खते वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
''गावोगावी धोंडी धोंडी पाणी दे,सायमाय पिकू दे'', म्हणत शेतकरी कंबरेला कडू लिंबाचे फाटे बांधून अन् खांद्यावर मुसळाला बेंडकोळी लटकवून देवाकडे पावसाची प्रार्थना करताना दिसत आहेत. सगळीकडे शेतकरी पाऊस कधी पडणार म्हणून आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत. मात्र पाऊस काही पडत नाही.