Parbhani Tadkalas-Purna bus service: ताडकळस–पूर्णा बससेवा बंद; नागरिकांची गैरसोय; तात्काळ बस सुरु करण्याची मागणी

Tadkalas-Purna bus service stopped : ताडकळस–पूर्णा बससेवा बंद; नागरिकांची गैरसोय; तात्काळ बस सुरु करण्याची मागणी
ST Bus
ST Bus
Published on
Updated on

परभणी- ताडकळस व परिसरातील नागरिकांना पूर्णा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय कार्यालयातील कामे, दवाखाना, तहसील कार्यालय,न्यायालयीन कामकाज तसेच इतर दैनंदिन गरजांसाठी पूर्णा येथे जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

एकीकडे ग्रामीण भागाच्या विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे नागरिकांना साधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ताडकळस–पूर्णा मार्गावरील बससेवा नेमकी बंद का आहे? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

घोषणा नको, बस हवी!

ग्रामीण भागातील नागरिकांना विकासाच्या मोठमोठ्या घोषणा नकोत; तर त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडित मूलभूत सुविधा हव्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बससेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. बस नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असतील, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेमकी कोणासाठी? असा संतप्त सवालही नागरिकांकडून केला जात आहे.

ताडकळस परिसरातून विविध दिशांना नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामध्ये पुर्व नियोजित असलेल्या बस सुरू करण्यात याव्या या अगोदर या बस सेवा चालू होत्या. परंतु, कोरोना काळात ही बस सेवा बंद करण्यात आल्या. पण पुन्हा या बस सेवा चालू करण्यात आल्या नसल्याने या परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही बस नाही. खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

शिंगणापूरमार्गे पूर्णा, गंगाखेडमार्गे पालम, ताडकळस–पूर्णा तसेच परभणीमार्गे ताडकळस–पालम–लोहा अशा मार्गांवर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणीही होत आहे.

लोकप्रतिनिधींनी एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा

ताडकळस हा परिसरातील महत्त्वाचा केंद्रबिंदू असून आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे या मार्गांवर एसटीच्या नियमित बसफेऱ्या सुरू करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे ठोस पाठपुरावा करावा, तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news