Purna Farmer Fraud Case | एरंडेश्वर येथील शेतकरी फसवणूक प्रकरणी फरार आडत व्यापारी जेरबंद

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; ५ कोटी ५६ लाख ४९ हजार ३०० रुपयांच्या शेतीमालाचे चुकारे न देता झाले होते पसार
 Erandeshwar  Jay Kisan Trading Company Scam
Jay Kisan Trading Company ScamPudhari
Published on
Updated on

Erandeshwar Jay Kisan Trading Company Scam

पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर येथील झिरोफाटा परिसरातील जयकिसान ट्रेडिंग कंपनीच्या आडत दुकानदारांनी अनेक शेतकऱ्यांकडून हळद, हरभरा, गहू, तूर आणि सोयाबीन असा शेकडो क्विंटल शेतीमाल उधारीवर खरेदी केला. मात्र, या शेतीमालाचे सुमारे ५ कोटी ५६ लाख ४९ हजार ३०० रुपयांचे चुकारे न करता संबंधित आडत व्यापारी पसार झाले होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एरंडेश्वर येथील शेतकरी रामप्रसाद साहेबराव काळे यांनी १८ जुलैरोजी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन पाटील व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. मात्र, गुन्ह्याची व्याप्ती सुमारे साडेपाच कोटी रुपयांची असल्याने पुढील तपास पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

 Erandeshwar  Jay Kisan Trading Company Scam
Parbhani Crime | जिंतूरमध्ये गुटखा तस्करीवर छापा ; ७.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. जी. जमदाडे यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध सुरू केला. दरम्यान, आरोपींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जमदाडे यांनी पोलिस हवालदार पंडित खरडे, माधव जंगम, जीपीएसआय सिरस्कर, जुबेर तसेच केज (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई केली.

या कारवाईत शेख हमीद ऊर्फ अमित, पिता शेख सरू, शेख सरू, पिता शेख बालेसाहेब, (दोघेही रा. एरंडेश्वर, ता. पूर्णा), यांना १४ ऑगस्टरोजी ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 Erandeshwar  Jay Kisan Trading Company Scam
Parbhani Crime : बाजारात चोरीचे बैल विकणारे दोघे पकडले

दरम्यान, आरोपी आडत दुकानदारांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतीमाल विकून मिळालेल्या रकमेतून बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये एफडी केल्याचे तपासात समोर आले. ही रक्कम जप्त करण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यात यश आल्याने शेतकरी वर्गातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाचे कौतुक होत आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news