

Child Labor Rescue Parbhani
चारठाणा : सेलू तालुक्यातील नांदगाव शेतशिवार परिसरात आर. बी. घोडके कन्स्ट्रक्शनकडे कामासाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील मजुरांना जादा मजुरीचे आमिष दाखवून जबरदस्तीने अधिक काम करून घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मजुरांना कमी पैसे देण्यात आले असून, आल्पवयीन मुलांकडूनही मजुरीचे काम करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून एकूण २९ कामगार व ७ लहान मुलांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदगाव शेतशिवारातील कामाच्या ठिकाणी ठेकेदार व एका कामगारामध्ये झालेल्या वादातून हा प्रकार समोर आला. संबंधित ठेकेदार व कामगार हे दोघेही तेलंगणा राज्यातील असून, वादानंतर संबंधित कामगार आपल्या मूळ गावी परत गेला. तेथे त्याने नांदगाव येथील क्रेशरवर काम करणाऱ्या मजुरांकडून नियमित वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जात असल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल एफडीसी (FDC) या स्वयंसेवी संस्थेने घेतली व प्रकरण न्यायालयात मांडले. न्यायालयामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तातडीने दखल घेत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व जिंतूर तहसीलदार श्रीमती शीतल कच्छवे यांना योग्य कार्यवाहीचे आदेश दिले.
त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरोदे, चारठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश म्हेत्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने रात्री ३ ते सकाळी ६ या वेळेत घटनास्थळी पाहणी केली. या वेळी माननीय न्यायाधीश भूषण काळे हेही उपस्थित होते.
या कारवाईत तेलंगणा राज्यातील २९ मजूर व ७ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, तत्त्वशील कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब काकडे (रा. नांदगाव शेतशिवार, ता. सेलू), भुसाबागा येरेया (रा. वनपटला, जि. नागरकुर्नूल), मित्तेकृष्णया (रा. वेरचरला मंडळ, जि. नागरकुर्नूल) व एकतापु पैतया (रा. गुडपल्ली, जि. नागरकुर्नूल, राज्य तेलंगणा) या चौघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे करीत आहेत.