

Chudawa Railway Station Cement Sleeper Industry Protest
पूर्णा : तालुक्यातील चुडावा रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित सिमेंट स्लिपर उद्योगाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने फेरफार नोंदी करून शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगासाठी हस्तांतरित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकरी तथा विधीज्ञ चेतन चिंतामणराव देसाई यांनी २२ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. चुडावा येथील गट क्रमांक २६५/१ आणि २७१ मधील फेरफार क्रमांक ३०८० ते ३०८४ संदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी बेकायदेशीर व पक्षपाती कार्यवाही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
देसाई यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीबाबत निर्देश देण्यात आले होते. तसेच वरिष्ठ स्तरावर प्रकरण विचाराधीन असतानाही तहसीलदारांनी २१ मे २०२६ रोजी आदेश पारित केल्याने संशय निर्माण झाला आहे. संबंधित आदेशाची अधिकृत प्रत अर्जदाराला देण्यात आली नसून त्याबाबत कोणतीही माहितीही देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुमारे ६० दिवसांच्या कायदेशीर मुदतीची प्रतीक्षा न करता घाईघाईने पुढील प्रक्रिया राबवण्यात आल्याने संपूर्ण कार्यवाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित उद्योगासाठी काही ठिकाणी जमीन सपाटीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना जमीन द्यायची इच्छा नाही, त्यांच्या जमिनीही परस्पर फेरफार करून उद्योगासाठी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, हा सिमेंट उद्योग सुरू झाल्यास परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ आणि प्रदूषण निर्माण होऊन शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा उद्योग सुरू होऊ नये, अशी मागणी करत शेतकरी आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.
सदर प्रकरणातील कथित बोगस फेरफार नोंदींची सखोल चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.