

Aherwadi villagers affected Thuna river flood
पूर्णा : तालुक्यातील आहेरवाडी गावाला शुक्रवारी (दि.२६) आणि शनिवारी (दि.२७) झालेल्या मुसळधार पावसामुळे थुना नदीच्या पुराचा पुन्हा एकदा वेढा बसला आहे. यापूर्वी तीनदा पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला होता, तर आता चौथ्यांदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावाच्या पश्चिमेकडील श्री सजगीरकृपा मंदिराजवळून थुना नदीला मोठा पूर आला असून, नदीने पात्र ओलांडल्याने पाणी शेतशिवार व गावालगतच्या भागात घुसले आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडले आहेत.
नदीकाठच्या शेतांमधील पिके वाहून गेली असून, गाळमातीसह जमीन खरडली गेल्याने मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आहेरवाडीतील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पिकांच्या नुकसानीबरोबरच जमीन खरडून गेलेली हानीही भरपाईत समाविष्ट करावी. तसेच खरीप हंगाम वाया गेल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.