

परभणी : परभणी शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्याचा मोठा दबाव राहटी येथील जलशुद्धीकरण केंद्र व पंपगृहावर वाढला असून गाळ साचल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने परभणी शहराला राहटी येथून होणारा पाणीपुरवठा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे काही भागांमध्ये कमी दाबाने किंवा विस्कळीत स्वरूपात पाणीपुरवठा होण्याची शक्यता मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर व शुद्धीकरण केंद्र सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. दरम्यान महानगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मनपा प्रशासनाने शहरातील नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वेळोवेळी आवश्यक ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी वापरताना काटकसर करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.