Parbhani News: गर्भवतीसह बाळाच्या मृत्यूची सात सदस्यीय समितीकडून चौकशी, १०८ रुग्णवाहिका विलंबाचे गूढ उलगडणार

रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने गर्भवती महिला व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने गठित केलेल्या सात सदस्यीय समितीने चौकशी सुरू केली.
Ambulance
Ambulance File Photo
Published on
Updated on

Parbhani News

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालय येथे १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने गर्भवती महिला व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने गठित केलेल्या सात सदस्यीय समितीने सोमवारी (दि. १०) रात्री परभणीत दाखल होत चौकशी सुरू केली. सुमारे दोन ते तीन तास समितीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. रुग्णवाहिका सेवेशी संबंधित नोंदी, रुग्णालयातील कागदपत्रे आणि उपचार प्रक्रियेबाबतही समितीने माहिती घेतल्याचे समजते.

जिंतूर येथून एका गंभीर स्थितीतील गर्भवती महिलेला शुक्रवारी रात्री पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. परभणी येथील रुग्णालयात आणल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने येथील डॉक्टरानी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले मात्र, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे उपचारास प्रचंड विलंब झाला. योग्य वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्याने आधी पोटातील बालकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचाही दुर्दैवी अंत झाला.

Ambulance
Crime news: तरूणाच मुंडक तोडलं, गुप्तांग कापलं...; झुडपांमध्ये आढळला छिन्नविछिन्न मृतदेह, भोपाळ हादरले

याबाबत मयत महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर व सोमवारी वर्तमानपत्रांमध्ये रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाने या घटनेची तातडीने दखल घेतली. सहसंचालक आरोग्य सेवा, रुग्णालय (राज्यस्तर), मुंबई यांच्या दूरध्वनी संदेशानंतर छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयाने तातडीने चौकशी समिती गठित केली.

ही चौकशी समिती सहाय्यक संचालक (वैद्यकीय) डॉ. दयानंद मोतीपवळे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. डॉ. लता वेडेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूलतज्ज्ञ डॉ. अर्चना वसुकर, भूलतज्ज्ञ डॉ. पद्मजा सराफ, वरिष्ठ लिपिक विनोद खंडागळे, वरिष्ठ लिपिक प्रदीप गायकवाड आणि विभागीय सार्वजनिक आरोग्य कार्यशाळेचे सेवा व्यवस्थापक बी. एल. दुबे यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे.

समितीने सोमवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांकडून माहिती घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र वर्मा, महापौर सय्यद इकबाल यांच्यासह आदी डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान घटनेच्या वेळी गर्भवती महिलेची परिस्थिती काय होती, तिला कोणत्या ठिकाणाहून रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, १०८ क्रमांकावर किती वेळा संपर्क करण्यात आला, रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब का झाला, तसेच रुग्णालयातील उपचार व पुढील रेफरल प्रक्रियेत नेमक्या कोणत्या बाबी घडल्या, याबाबत समितीने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.

यासोबतच संबंधित कागदपत्रे, रुग्णालयीन नोंदी आणि रुग्णवाहिका सेवेच्या उपलब्ध नोंदी तपासण्याच्या दृष्टीने समितीने माहिती संकलित केली आहे. या सर्व बाबींच्या आधारे चौकशी अहवाल तयार केला जाणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेतील आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १०८ सेवेला केलेल्या कॉलपासून रुग्णवाहिका प्रत्यक्ष उपलब्ध होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची चौकशी समिती तपासणार असल्याने या चौकशी अहवालातून नेमकी जबाबदारी कोणाची निश्चित होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Ambulance
Bengaluru hotel crime: पंचतारांकित हॉटेलात बापाने दोन मुलींची हत्या केली, नंतर स्वतःचा गळा चिरला; चिठ्ठीत धक्कादायक कारण उघड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news