Parbhani police bust cattle thief gang| जनावरे चोरांच्या आंतरजिल्हा टोळीचा परभणीत पर्दाफाश

पाच गुन्ह्यांची उकल; दोघांना अटक, तिघे फरार
  Crime News
Crime News pudhari photo
Published on: 
Updated on: 

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विविध भागांत जनावरांची चोरी करून त्यांची कत्तल आणि मांसविक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत टोळीतील दोघांना अटक केली असून, जनावर चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. चोरी केलेल्या जनावरांची कत्तल करून मांसविक्रीतून मिळवलेली एक लाख ९० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. या टोळीतील अन्य तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.

जिल्ह्यातील परभणीसह ग्रामीण भागात जनावर चोरीच्या घटना घडत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी जनावर चोरी करणाऱ्या टोळीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या आधारे रहमाननगर, सेलू येथे वास्तव्यास असलेल्या शेख खालिद उर्फ अशफाक उर्फ असलम (वय ३५) आणि नदीम मोईन कुरेशी (वय २३) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोन्ही संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनावर चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली. परभणी शहरासह पालम, गंगाखेड, मानवत, पाथरी आणि जिंतूर परिसरात या टोळीने जनावरे चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेल्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री केले जात असल्याचेही समोर आले. या व्यवहारातून मिळालेली एक लाख ९० हजार रुपयांची रोकड आरोपींकडून जप्त केली.

या कारवाईत एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. यामध्ये सेलू ठाण्यातील दोन, ताडकळस ठाण्यातील १, कोतवाली ठाण्यात १ आणि परभणी ग्रामीण ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. या प्रकरणात शेख खालिद उर्फ अशफाक उर्फ असलम (रा. रहमाननगर, सेलू) आणि नदीम मोईन कुरेशी (रा. रहमाननगर, सेलू) या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर शेख अकबर शेख शौकत (रा. भिवंडी, सध्या जिंतूर), मुदसीर मुक्तार कुरेशी आणि मुजाहिद मुक्तार कुरेशी (दोघेही रा. फुलेनगर, परभणी) हे हे तिघे फरार आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले. या टोळीने यापूर्वीही अन्य गुन्हे केल्याची माहिती तपासा दरम्यान पुढे आली. त्यामुळे आरोपींच्या चौकशीतून जनावर चोरीच्या आणखी घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

  Crime News
Parbhani Car Accident | परभणी–मानवत महामार्गावर कार पुलावरून कोसळली; सहा जण जखमी

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली केली. पथकात पोउपनि गणेश सवंडकर, श्रेणी पोउपनि मधुकर चट्टे, सपोउपनि सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोह सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, विलास सातपुते, चापोह उत्तम हनवते, तांत्रिक सपोउपनि बालाजी रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने जिल्ह्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला. तीन आरोपी फरार असल्याने त्यांच्या अटकेकडे लक्ष लागले आहे.

  Crime News
Parbhani Crime : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे १० लाखांचा गुटखा जप्त, परभणी पोलिसांची कारवाई!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.