

Pathri Cyber Crime
पाथरी : शहरातील आठवडी बाजारात भाजी पाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा मोबाईल हॅक करून तब्बल १ लाख ५९ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख हाशम शेख करीम (वय ३२, रा. खेर्डा, ता. पाथरी, जि. परभणी) हे गुरूवारी (दि.२६) दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पाथरी येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तीने छेडछाड करून ऑनलाइन व्यवहार केल्याचा संशय आहे.
दरम्यान, दुपारी ४ वाजून ३ मिनिटांनी त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातून ९८ हजार रुपये, तर ४ वाजून १४ मिनिटांनी एक हजार रुपये तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया येथील खात्यातून २० हजार रुपये काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन्ही बँक खात्यांचे स्टेटमेंट तपासले असता एकूण १ लाख ५९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आपल्या मोबाईलचा अज्ञात व्यक्तीने गैरवापर करून बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे शेख हाशम शेख करीम यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२७) गुन्हा क्रमांक ०६५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.