

Godavari River Water Discharge
पाथरी : जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाथरी तालुक्यातील उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यात अवघ्या २४ तासांत १९.६६७ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाण्याची आवक झाल्याने बंधाऱ्यातील पाणीसाठा ८४.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढती आवक लक्षात घेता सोमवारी सकाळी ७ वाजता गेट क्रमांक ५ उघडून ७ हजार ७८५ क्युसेक (२२०.५ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला.
जायकवाडीचे पाणी गोदावरी नदीपात्रातून ढालेगावमार्गे तारुगव्हाण बंधाऱ्यात पोहोचत असल्याने तेथील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली. सोमवारी दुपारी २ वाजता तारुगव्हाण बंधारा ९२ टक्के क्षमतेने भरल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने एक गेट उघडण्यात आले. या गेटमधून ८ हजार ३०० क्युसेक (२३५.०४ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात किंवा कमी करण्यात येणार आहे.
पाथरी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातील पाण्याची आवक वाढल्याने ढालेगाव, मुदगल आणि तारुगव्हाण या तिन्ही बंधाऱ्यांची पाणीपातळी वाढत आहे. या बंधाऱ्यांवर तालुक्यातील मोठे सिंचन क्षेत्र अवलंबून असल्याने वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ढालेगाव बंधाऱ्याची पूर्ण संचय पाणीपातळी ३९४.२० मीटर आहे. सोमवारी सकाळी बंधाऱ्यातील पाणीपातळी ३९३.८० मीटरवर पोहोचली. बंधाऱ्यात एकूण १२.८० दलघमी पाणीसाठा असून, त्यापैकी ११.४३ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ८४.६७ इतकी झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत बंधाऱ्यात २०.६८७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या पाण्याच्या आवकेमुळे तारुगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्यातील साठा वेगाने वाढला. सोमवारी दुपारी २ वाजता बंधारा ९२ टक्के क्षमतेने भरल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने एक गेट उघडण्यात आले. त्यातून ८ हजार ३०० क्युसेक (२३५.०४ क्युमेक) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गाचे प्रमाण बदलले जाण्याची शक्यता आहे.
मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यात सोमवारी सकाळी पाणीपातळी ३८२.१० मीटर होती. बंधाऱ्याची पूर्ण संचय पाणीपातळी ३८४ मीटर आहे. सध्या बंधाऱ्यात एकूण ५.५६ दलघमी पाणीसाठा असून, त्यापैकी ५.०५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. जिवंत साठ्याची टक्केवारी ४४.४१ आहे. गोदावरी नदीपात्रातून होणारी आवक पाहता रात्री उशिरापर्यंत मुदगल बंधाऱ्याची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ढालेगाव
एकूण पाणीसाठा : १२.८० दलघमी
जिवंत पाणीसाठा : ११.४३ दलघमी
साठा : ८४.६७ टक्के
२४ तासांतील आवक : १९.६६७ दलघमी
उघडलेले गेट : १
विसर्ग : ७,७८५ क्युसेक
तारुगव्हाण
साठा : ९२ टक्के
विसर्ग सुरू : दुपारी २ वाजता
उघडलेले गेट : १
विसर्ग : ८,३०० क्युसेक
विसर्गाचे प्रमाण : २३५.०४ क्युमेक
मुदगल
एकूण पाणीसाठा : ५.५६ दलघमी
जिवंत पाणीसाठा : ५.०५ दलघमी
साठा : ४४.४१ टक्के
२४ तासांतील आवक : शून्य
उघडलेले गेट : ०
विसर्ग : ० क्युसेक
ढालेगाव आणि तारुगव्हाण बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे, पोहणे तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन लघु पाटबंधारे उपविभाग, परभणीचे उपविभागीय अभियंता एस. एस. हाके यांनी केले आहे.