

Newborn baby's life saved
परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील आर.पी. हॉस्पिटलच्या नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमधून १ हजार ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या नवजात बालकाला ६० दिवसांच्या अथक उपचारानंतर नवजीवन मिळाले.
सात महिन्यांत जन्मलेल्या या बालकाची अवस्था अत्यंत नाजूक होती. बालरोगतज्ञ डॉ. बाबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ञांच्या टीमने अत्याधुनिक उपचार पद्धती आणि कौशल्याचा वापर करून यशस्वी उपचार केले. विशेष म्हणजे, वालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही हॉस्पिटलने कोणताही भेदभाव न करता संपूर्ण उपचार प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आणि या लहान जिवाला नवजीवन बहाल केले. जन्मतःच या बालकाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच फुफ्फुसांचा पूर्ण विकास न झाल्याने श्वसनाचा त्रास होत होता. त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ३१ दिवसांच्या व्हेंटिलेटर उपचारानंतर बालकाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. त्यानंतर त्याला सिपॅप आणि नंतर हाय फ्लो नेझल कॅन्युलावर ठेवण्यात आले.
उपचारादरम्यान बालकाच्या आतड्यांवर सूज आणि संसर्गाची समस्या उद्भवली. मात्र, आर.पी. हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक वैद्यकीय पद्धती आणि उच्च प्रतीच्या औषधांचा वापर करून या आव्हानांवर यशस्वीपणे मात केली. याबद्दल हॉस्पिटलचे प्रमुख आ.डॉ. राहुल पाटील यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले असून कुटुंबाने देखील आ. पाटील यांचे आभार मानले आहेत. डॉ. गायकवाड म्हणाले, ही नवजात बालकांमधील गंभीर अवस्था आहे, विशेषतः कमी वजनाच्या अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये. या बालकाचे वजन केवळ १ हजार ग्रॅम होते आणि त्याला व्हेंटिलेटरसह सतत देखर-`खीची गरज होती. आमच्या चमूने अत्यंत काळजीपूर्वक आणि समर्पितपणे उपचार केले. बालकाच्या आईने आनंदाश्रूनी सांगितले, माझ्या मुलाला नवजीवन मिळाले, यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी नाही.
या यशस्वी उपचार प्रक्रियेत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी आणि डॉ. बाबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अरबाज शेख, डॉ. इरफान शेख, नर्सिंग स्टाफ अनुसया बने आणि रोहिणी जोगदंड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बालकाचे वडील भावूक होत म्हणाले, आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे. आमच्या मुलावर उपचार करणे आम्हाला परवडणार नाही, असे वाटले होते. पण आ.डॉ. पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि स्टाफने आम्हाला आधार दिला. त्यांनी आमच्या मुलाला आपल्या कुटुंबाचा हिस्सा मानून उपचार केले. आज आमचा मुलगा सुखरूप घरी परतला, याचे श्रेय आम्ही हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि स्टाफला देतो.