

Parbhani News: Stalled water supply in Loni Bk. finally resumes
पाथरी, पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या तालुक्यातील लोणी बु. येथील ग्रामस्थांना अखेर दिलासा मिळाला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने शनिवारी (दि.३१) लोणी बु. येथील पाणीपुरवठा अखेर सुरू करण्यात आला. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांसह गावांतर्गत असलेल्या चार तांड्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
लोणी बु. येथील जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. योजनेचे काम पूर्ण होऊन गावाला नियमित पाणी मिळेल, या अपेक्षेने ग्रामस्थ वाट पाहत होते. मात्र, कामातील दिरंगाई आणि संबंधित यंत्रणेच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडत होती. सध्या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून गावातील पाण्याचे स्रोतही कोरडे पडले आहेत.
परिणामी, महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे, तरुगव्हाण बंधाऱ्यातील विहिरीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण न झाल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते.
संबंधित ठेकेदाराच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात होता. या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित गिराम यांनी १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, परभणीच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
रखडलेले काम आठ दिवसांत पूर्ण करून लोणी बु. सह चार तांड्यांचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. अन्यथा १ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. तीन वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नावर आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची भूमिका धर्मे यांनी घेतली होती. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन दैनिक 'पुढारी'नेही वृत्त प्रसिद्ध करत रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला होता.
दरम्यान, आमरण उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची हालचाल सुरू झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराला तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर युद्धपातळीवर काम पूर्ण करून शनिवारपासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून सुरू होणारे प्रस्तावित आमरण उपोषण टळले असून, प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रश्न सुटला; पण कामाच्या दर्जावर लक्ष हवे
पाणीपुरवठा सुरू झाल्याने लोणी बु. येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गावाच्या मूलभूत प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जागे केल्याबद्दल रवींद्र धर्मे आणि रणजित गिराम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. मात्र, तीन वर्षे रखडलेली योजना आता सुरू झाली असली तरी जलजीवन मिशनअंतर्गत संपूर्ण कामाची पूर्तता करणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक घरापर्यंत नियमित, पुरेशा दाबाने आणि शुद्ध पाणी पोहोचेल, याची प्रशासनाने खात्री करावी. तसेच योजनेतील उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.