

गंगाखेड : राज्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाहनावर दोन व्यक्तींनी रेड ऑक्साईड फेकल्याची घटना गुरूवारी (दि.30) दुपारी गंगाखेड शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश भगवानराव फड (वय 38) आणि दीपक शिवराम फड (वय 35, दोघे रा. खातगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी संशयितांची नावे आहेत.
पालकमंत्री बोर्डीकर या गुरूवारी (दि.30) गंगाखेड येथील कापसे मंगल कार्यालयात आयोजित जनता दरबार कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रम सुरू होत असताना पालकमंत्री यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होत असताना दुपारी 2.35 वाजता दोन व्यक्तींनी त्यांच्या कार (क्र. HR89W3456) कारवर लाल रंगाचा द्रव पदार्थ फेकला. शेतकऱ्यांना कर्जमाफी व अनुदान मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत त्यांनी द्रव फेकण्याचा प्रयत्न केला. ताफ्यातील उपस्थित पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संबंधितांना ताब्यात घेतले.
पोलिस शिपाई दत्ता कुंडलिक चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून तपासादरम्यान फेकण्यात आलेला पदार्थ रेड ऑक्साईड (Red Oxide Strike Hi Gloss) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी योगेश फड आणि दीपक फड या दोघांविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 118(1), 125, 221, 62, 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.