

Manwat polling updates
मानवत : मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद व 11 प्रभागातील 22 सदस्यांसाठी मंगळवारी (दि.२) झालेल्या निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत फक्त 49.30% मतदान झाले. सकाळपासून दुपारी साडेचार पर्यंत शहरात प्रत्येक केंद्रावर मतदानाचा जोर कमी होता. साडेचार नंतर मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
शहरात 32,599 मतदार संख्या असून यामध्ये 16356 पुरुष तर 16,243 महिला यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या राणी अंकुश लाड व भाजप सेना युतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर अंजली महेश कोक्कर यांच्यात थेट लढत होती. आज सकाळी सात वाजता शहरातील 13 इमारतीतील 35 मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी असे एकूण 175 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सकाळी साडेनऊ पर्यंत 2051 म्हणजे 6.29 टक्के मतदारांनी मतदान केले. सकाळी साडे अकरा पर्यंत 5799 म्हणजे 17.79 तर दुपारी साडेतीन पर्यंत 16070 म्हणजे 49.30 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील इतर सहा नगरपालिकेच्या तुलनेत सर्वात कमी मतदानाची नोंद दुपारी साडेतीन पर्यंत झाली. सायंकाळी चार नंतर मात्र शहरातील सर्वच केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केल्याने केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. शहरातील काही केंद्रावर रात्री आठ पर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे.
शहरातील दिव्यांग व वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर ची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु शहरातील शकुंतलाबाई कत्रुवार विद्यालयात व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने दिव्यांग वृद्ध मतदारांचे मोठे हाल झाले. मतदानादरम्यान परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी शहरातील दोन केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.
शहरात व मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी महेश गायकवाड व नायब तहसीलदार संजय खिल्लारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.