

मानवत : तालुक्यातील खरबा येथे किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन तिघांनी मिळून एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय अप्पाराव कांबळे (रा. खरबा, ता. मानवत) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी दादाराव सटवाजी कांबळे यांनी दारूच्या नशेत फिर्यादीस शिवीगाळ केली होती. त्यावेळी समजूत काढण्यात आली होती.
मात्र, दुसऱ्या दिवशी दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी दादाराव सटवाजी कांबळे, माऊली दादाराव कांबळे आणि भाग्यश्री सटवाजी कांबळे हे तिघे फिर्यादीच्या घरासमोर आले. “काल मला दारू पिऊ नको असे का म्हणालात?” या कारणावरून त्यांनी वाद घालत फिर्यादीस तसेच त्यांच्या नातेवाईक महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच चाकूने ठार करण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५(२), २९६, ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार मानवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.