

Manwat Bypass Auto Bike Collision
मानवत : शहराबाहेरील बायपास ला जाणाऱ्या संत सावता माळी टी पॉईंटवर सोमवारी (दि. 12) सायंकाळी ५. ३० चे सुमारास मोटरसायकलला सिमेंट वाहतूक करणाऱ्या ऑटोने जोरदार धडक दिली. यात एक युवक गंभीर जखमी झाला. धडक दिल्यानंतर ऑटो चालक घटनास्थळावरून पसार झाला.
या अपघातात एमएच-२२-जे-९४५९ या क्रमांकाची मोटरसायकल नुकसानग्रस्त झाली असून तिच्यावर स्वार असलेला किरण संजय भांड (२१, रा. मानोली, ता. मानवत) हा गंभीर जखमी झाला.
Parbhaniअपघातानंतर रस्त्यावर मोटरसायकल कडेला फेकली गेली आणि काही काळ वाहतूकही खोळंबली होती. परिसरातील नागरिकांनी तत्काळ जखमीला मदत करत रुग्णवाहिका बोलावली. किरण भांड याला प्रथम मानवत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यास परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, धडक देणारा सिमेंट वाहतूक करणारा पियाजिओ ऑटो फरार झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत असून अशा वाहने बायपासवर धोकादायकपणे धावत असल्याची चर्चा रंगली. अपघाताच्या घटनेबाबत अद्याप गुन्हा नोंद झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातस्थळी झालेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सतत होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर बायपासवर गस्ती वाढविण्याची आणि वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.