

Parbhani Local Body Election
मानवत: मानवत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज (दि.17) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले. आज अध्यक्षपदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 36 अर्ज भरल्यामुळे, नगराध्यक्षपदासाठी एकूण सात आणि सदस्यपदासाठी 117 उमेदवार सध्या रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार राजेश विटेकर व डॉ. अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराणा प्रताप चौकापासून मुख्य रस्त्याद्वारे नगरपालिकेपर्यंत रॅली काढून अर्ज दाखल करण्यात आला. तसेच, संत सावता माळी चौकात सभा देखील घेण्यात आली. या रॅलीत युवकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
शिवसेना-भाजप युतीच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नगरपालिकेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिलांची संख्या विशेष लक्षवेधी होती. सभेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि इतर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी शहरातील सहा महिलांनी सात अर्ज दाखल केले. प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राणी अंकुश लाड आणि शिवसेना-भाजप युतीकडून अंजली महेश कोक्कर यांचा समावेश आहे. याशिवाय शोभा दिनकर कोक्कर, पद्माबाई बाबासाहेब दासेवार, रेश्मा किरण बारहाते यांचे प्रत्येकी एक अर्ज, तर शितल गणेश कुर्हाडे यांचे दोन अर्ज दाखल झाले आहेत.