

Manwat Shiv Sena BJP alliance
मानवत : मानवत नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती होऊन सर्व जागा लढविण्याची घोषणा युतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. नगराध्यक्षपद हे शिवसेनेला सोडण्यात आले असून अंजली महेश कोक्कर या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणार आहेत.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोलाईत, बालाजी कुऱ्हाडे, महेश कोक्कर आदी उपस्थित होते.
भाजपचे सुरेश भुमरे, सुरेश वरपुडकर व शिवसेनेचे सईद खान यांनी भाजप शिवसेना युतीची घोषणा यावेळी केली. परंतु कोणता पक्ष किती जागा लढणार याची माहिती दिली नाही. नगराध्यक्ष पद हे शिवसेनेच्या वाट्याला गेले असून माजी नगराध्यक्ष महेश कोक्कर यांच्या पत्नी अंजली कोक्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
मानवत नगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढविणार असल्याचे सेना भाजपच्या नेत्यांनी सांगितले. पत्रकार परिषद काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या घरी घेतल्याने ते काँग्रेस सोडणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना चांडक म्हणाले, “गाव, जिल्हा, राज्य, देशासाठी काम करणाऱ्यांच्या सोबत आम्ही सदैव आहोत. मात्र, काँग्रेस सोडण्याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष राणी लाड या रिंगणात उतरणार असून शिवसेना भाजप युतीच्या वतीने सेनेच्या तिकिटावर माजी नगराध्यक्ष महेश कोक्कर यांच्या पत्नी अंजली कोक्कर या निवडणूक लढविणार आहे. सध्यातरी या दोन्ही उमेदवारातच सरळ लढत होण्याची शक्यता असली तरी 17 नोव्हेंबर नंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.