

Parbhani News
जिंतूर : परभणी जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या तलाठी सजा कार्यालयात कार्यरत करण्याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश असतानाही त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये कायम असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांनी केली आहे. या गंभीर प्रशासकीय मुद्द्याची दखल घेत महसूलमंत्र्यांनी स्वतः विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना चौकशी करून नियमाप्रमाणे उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
विभागीय आयुक्तांनी १३ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक १२ मध्ये जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या कोतवालांना तात्काळ कार्यमुक्त करून सजा स्तरावरील कामकाजासाठी उपलब्ध करून देण्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तलाठी सजा कार्यालयातील नियमित उपस्थिती, कामकाजाचे वेळापत्रक, नागरिकांना आवश्यक संपर्क सुविधा, फेरफार नोंदींची विहित मुदतीत पूर्तता आणि महसूल कार्यालयांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याबाबतही या परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळे गावपातळीवरील महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे आडे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तलाठी सजा कार्यालयात कोतवाल उपलब्ध नसल्यास सातबारा, फेरफार, ई-पीक पाहणी, पीक नुकसानीचे पंचनामे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत व पुनर्वसनाच्या कामांसाठी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कार्यालयीन सोयीपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल सेवा वेळेत मिळणे महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
या प्रकरणी संजय रामराव आडे यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार निवेदन सादर केले होते. या निवेदनावर महसूलमंत्र्यांनी “विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर-अ-चौकशी करून नियमाप्रमाणे उचित कार्यवाही करावी” असे स्पष्ट निर्देश दिले. महसूलमंत्र्यांच्या या निर्देशानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तक्रारीतील मुद्द्यांची चौकशी करण्यास तसेच कार्यालयीन अभिप्रायासह वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
महसूलमंत्र्यांच्या निर्देशानुसार सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे आता जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागीय आयुक्तांच्या परिपत्रकातील आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करून कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कोतवालांना त्यांच्या मूळ तलाठी सजा कार्यालयात तात्काळ कार्यरत करावे, तसेच आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबाबत चौकशीत त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी आडे यांनी केली आहे.
महसूलमंत्र्यांनी चौकशी करून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यानंतरही या प्रश्नाची अंमलबजावणी केवळ पत्रव्यवहारापुरती मर्यादित राहू नये. कोतवालांची सेवा गावपातळीवर उपलब्ध झाल्यास शेतकरी व सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी ठोस निर्णय घेऊन शासनाच्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.