

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: कोल्हेवाडी (ता. पूर्णा) गावाला जोडणारा रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि ग्रामस्थांच्या वतीने मागील तीन महिन्यांपासून आंदोलने करण्यात आली. परंतु, संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन आज (दि.२३) तहसीलदारांना देण्यात आले.
ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्याच्या कामासाठी मागील तीन महिन्यांपासून आंदोलने व पाठपुरावा करण्यात आला आहे. तरीही सबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामपंचायतीने रोहयो अंतर्गत मातोश्री पांदन रस्ता योजनेत रस्ता केल्याचे दाखवून बिले उचलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणे समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.