Parbhani news| खरीप २०२५ मधील अतिवृष्टी पिक विमा भरपाई मिळणार कधी?

पिक विमा कंपनीची उदासिनता शेतकऱ्यांच्या मुळावर
Parbhani news| खरीप २०२५ मधील अतिवृष्टी पिक विमा भरपाई मिळणार कधी?
Published on
Updated on

आनंद ढोणे

पूर्णा : तालुका परिसरातील ताडकळस, लिमला, चुडावा, कात्नेश्वर,पूर्णा, कावलगाव या सहाही महसूल मंडळात खरीप हंगाम २०२५ मधील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अनेकवेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत खरीपातील सोयाबीन, मुग, उडिद, कापूस ही पिके पुराचे पाणी वावरात शिरुन नदी ओढ्या काठी पिके खरडून गेली. तर उर्वरित सर्वत्र क्षेत्रातील पिके बाधित झाली.

सोयाबीन पिकाची प्रचंड नासाडी झाली. उत्पादन क्षमता केवळ पंचवीस टक्यावर येवून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. या पिकांचा असंख्य शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला. परंतु, एप्रिल २०२६ महिन्याची ९ तारीख उलटली तरी अद्याप पिक विमा नुकसान भरपाई सबंधीत विमा कंपनीने शेतकऱ्यांना अदा केली नाही. पिके वाया जावूनही आणि पैसे भरुन प्रिमीयम हप्ता उतरवला. मागच्या खरीप हंगाम २०२४ मध्य १ रुपयात पीक विमा असूनशुध्दा एप्रिल महिन्यात नुकसान भरपाई मिळाली होती.यंदातर शेतकऱ्यांनी पिकांची पैसे भरुन विमा पॉलिसी उतरवली. खरीपात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून पिकेही गेली. मग विमा नुकसान भरपाई का रखडवली? असा सवाल विमाधारक शेतकरी उठवत आहेत.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७५०० रुपये नुकसान भरपाई देण्याची वल्गना मुख्यमंत्र्यांनी केली होती. ती कुठे हवेत विरली? हे कळायला मार्ग नाही. त्याचबरोबर खरीप हंगाम २०२५ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नियम बदलून १ रुपयाचा नियम काढून सोयाबीन पिकासाठी साठी हेक्टरी ११५०० रुपये पैसे हप्ता भरुन घेतला. तसेच अतिवृष्टी,पावसाचा खंड हे ट्रिगर काढून त्या ऐवजी पिक कापणी अवरेज मोजमाप नियम लागू केला. त्याप्रमाणे ठिकठिकाणी प्लॉट क्षेत्र निवडून तेथील पिकाचा महसूल व कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिक कापणी प्रयोग केले. त्याचा अहवालही सबंधीत खात्याकडे पाठवण्यात आला. परंतु, त्यानुसार अजूनही प्रति हेक्टरी किती रुपये विमा नुकसान भरपाई द्यायची? हे निश्चित केले नाही. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पि एम एफ बी वाय या अधिकृत पोर्टलवर सध्या "अवेटेड कॅल्क्युलेशन"असेच दाखवत असून अजून द्यावयाची रक्कम चढवणे डाटा सुरु करण्यात आला नाही.या वरुन शासन व पिक विमा कंपनीची उदासिनता शेतकऱ्यांच्या मुळावर आली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरीप पीक विमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे या वरुन स्पष्ट होत आहे.

सदरील खरीप हंगाम २०२५ ची पिक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार?हे अजूनही शासन आणि संबंधित पिक विमा कंपनीने ठरवले नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पुढील २०२६ च्या खरीप हंगामासाठी शेतीमशागतची सुरुवात करत असून देखील मागची नुकसान भरपाई मिळालीच नाही. विशेष म्हणजे पूर्णा तालूक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी खरीप विम्या पोटी कोट्यवधी रुपये हप्ता रक्कम भरली. यात, विमा कंपनीचे चांगभले झाले परंतु शेतकऱ्यांना अजूनही एक दमडीही मिळाली नाही.परिणामी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस उडत आहे. त्याना ही पिक विमा योजना फसवी वाटत आहे. खरीप हंगाम २०२५ मधील पिक विमा नुकसान भरपाई येत्या आठ दिवसात नाही दिल्यास शेतकरी सरकार आणि पिक विमा कंपनी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याच्या पावित्र्यात आहेत.

पूर्णा तालूक्यात खरीप हंगाम २०२५ मध्य भरण्यात आलेल्या पिक विमा पॉलिसीचे विवरण

  • चुडावा मंडळ: शेतकरी संख्या ६००८, कर्जदार शेतकरी ५३०, बिगर कर्जदार १११८३,पिक क्षेत्र ७०६०६४, शेतकरी हप्ता ७७६२७६५.०९, राज्य हप्ता हिस्सा २७८५७१८५.४२, केंद्र हिस्सा २७८५७१८५.४२,ग्रोस हप्ता ६३४७७१३५.९३.

  • कात्नेश्वर मंडळ: शेतकरी संख्या ५१३९, कर्जदार १५५, बिगर कर्जदार ८१२७, पिक क्षेत्र ५८३२.५५, शेतकरी हप्ता ६५२४४७८.१७, राज्य हिस्सा २३५३८८१९.०४, केंद्र हिस्सा २३५३८८१९.०४,ग्रोस प्रिमियम ५३६०२११६.२५.

  • कावलगाव मंडळ: शेतकरी संख्या ६०५५, कर्जदार ७१०,बिगर कर्जदार १०२०, पिक क्षेत्र ६५०९.०६, शेतकरी हप्ता ७२२८१३२.४, राज्य हिस्सा २६८७१४५८.३५, केंद्र हिस्सा २६८७१४५८.३५,ग्रोस प्रिमियम ६०९७१०४९.१०.

  • लिमला मंडळ: शेतकरी संख्या ६५१७, कर्जदार ५८७,बिगर कर्जदार ११३९३, पिक क्षेत्र ७५३०.२३, शेतकरी हप्ता ८३७८८११.४२, राज्य हिस्सा २८८५३२३१.४, केंद्र हिस्सा २८८५३२३१.४,ग्रोस प्रिमियम ६६०८५२७३.५०.

  • पूर्णा मंडळ: शेतकरी संख्या ५१०५, कर्जदार १०९, बिगर कर्जदार ८७३९, पिक क्षेत्र ५६६२.३९, शेतकरी हप्ता ६३०८०७९.२५, राज्य हिस्सा २३३५५३६७.६२, केंद्र हिस्सा २३३५५३६७.६२,ग्रोस प्रिमियम ५३०१८८१४.४९.

  • ताडकळस मंडळ: शेतकरी संख्या ५६५६, कर्जदार १६३, बिगर कर्जदार ८८२९, पिक क्षेत्र ६६०३.०५, शेतकरी हप्ता ७३३३९१३.२७, राज्य हिस्सा २६०४२७७८.३९, केंद्र हिस्सा २६०४२७७८.३९,ग्रोस प्रिमियम ५९४१९४७०.०५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news