Parbhani Child Rescue | 15 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची थरारक सुटका

जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील घटना; महसूल, पोलीस, आरोग्य, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न
Parbhani Jintur Borewell Rescue Operation
दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. Pudhari
Published on
Updated on

Parbhani Jintur Borewell Rescue Operation

बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये बुधवारी (दि. १९) दुपारी तीन वर्षीय चिमुकला बंद बोअरवेलमध्ये पडल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या या बालकाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांसह महसूल, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी ३.३२ वाजता चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेख नदीम शेख करीम यांचा तीन वर्षीय मुलगा शेख अदनान शेख नदीम हा शेतात खेळत होता. खेळता खेळता तो बंद बोअरवेलजवळ गेला आणि अचानक त्यात पडला. तो सुमारे १५ फूट खोलीवर अडकून पडला होता. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Parbhani Jintur Borewell Rescue Operation
Parbhani Farmers Protest | ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी पाठवली. चिमुकला बोअरवेलमध्ये अडकल्याने त्याला थेट वर खेचणे धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर बचाव पथकाने पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. बोअरवेलच्या दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी सुमारे २० फूट खोल रॅम्प तयार करण्यात आला.

बचावकार्य सुरू असताना चिमुकला आणखी खाली घसरण्याचा धोका होता. त्यामुळे खबरदारी म्हणून बोअरवेलमध्ये लाकडी पाटी टाकून त्याला आधार देण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करताना चिमुकल्याला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी बचाव पथकाने अत्यंत सावधगिरीने काम केले. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. बचावकार्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने परिसरात आवश्यक खबरदारी घेतली.

Parbhani Jintur Borewell Rescue Operation
Parbhani Crime ‘चोरीमुक्त परभणी’चा केवळ देखावा? ६ महिने उलटले, तरी बड्या दरोड्याचे मारेकरी मोकाट!

दोन तासांच्या थरारक आणि तणावपूर्ण बचावकार्यानंतर दुपारी ३.३२ वाजता शेख अदनानला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमुकला बाहेर येताच कुटुंबीयांनी त्याला कवटाळले, तर उपस्थित ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याची प्रकृती तपासण्यासाठी तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

या बचावकार्यात महसूल, पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम केले. प्रशासनाने घटनास्थळी आवश्यक यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून देत चिमुकल्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले.

दोन रुग्णवाहिका, दोन जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापन वाहनाची मदत

बचावकार्यासाठी आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहिका, दोन जेसीबी तसेच महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार शीतल कच्छवे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, तलाठी गोरे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, घोरपडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत चेअरमन व सदस्य तसेच ग्रामस्थांनी बचावकार्यास सहकार्य केले.

Parbhani Jintur Borewell Rescue Operation
Parbhani News : सरपंच अपात्र, ग्रामसेवकाचीही विभागीय चौकशी

असुरक्षित बोअरवेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे ग्रामीण भागातील वापरात नसलेल्या आणि उघड्या बोअरवेलचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा असुरक्षित बोअरवेलमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील वापरात नसलेल्या बोअरवेलची पाहणी करून त्या सुरक्षितपणे बुजवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अदनान सुखरूप बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेने बोअरवेल सुरक्षेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news