Parbhani Farmers Protest | पिकांच्या नुकसानीवरून जोगवाडा शिवारातील शेतकऱ्यांचा संताप; क्रशर मशीनचे गेट बंद करून काम रोखले

पिंपरी गीते ते जिंतूर या मार्गावरील दुतर्फा डांबरीकरण, खोलीकरण आणि नाली बांधकामासाठी सुरू असलेल्या क्रशर मशीन व डांबर प्लांटमुळे पिकांचे नुकसान
Jintur Farmers Protest Crusher Machine
Jintur Farmers Protest Crusher Machine Pudhari
Published on
Updated on

Jintur Farmers Protest Crusher Machine

जिंतूर : नांदेड–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गाच्या पिंपरी गीते ते जिंतूर या मार्गावरील दुतर्फा डांबरीकरण, खोलीकरण आणि नाली बांधकामासाठी सुरू असलेल्या क्रशर मशीन व डांबर प्लांटमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत जोगवाडा शिवारातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.९) आंदोलनाचा पवित्रा घेतला. संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी नऊच्या सुमारास क्रशर मशीनचे गेट बंद करून काम बंद पाडले.

मध्यप्रदेशातील एका कंत्राटदाराने महामार्गाच्या कामासाठी जोगवाडा शिवारातील एका शेतकऱ्याकडून सुमारे सहा एकर जमीन मासिक भाडेतत्त्वावर घेऊन तेथे क्रशर मशीन आणि डांबर प्लांट उभारला आहे. मात्र, या यंत्रणेतून निघणारी धूळ, धूर आणि ब्लास्टिंगदरम्यान उडणाऱ्या दगडांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Jintur Farmers Protest Crusher Machine
Parbhani Crime : एकरुखा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी 2.12 लाखांचा ऐवज पळवला

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धूर व धुळीमुळे भुईमूग आणि भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम झाला असून काही शेतकऱ्यांच्या वांग्याचे पीक करपले आहे. ब्लास्टिंगमुळे उडणारे दगड थेट शेतात पडत असल्याने शेतीची हानी होत असल्याचाही आरोप करण्यात आला.

या संदर्भात शेतकऱ्यांनी यापूर्वी दोन वेळा जिंतूर तहसीलदारांकडे निवेदने सादर केली होती. तसेच चारठाणा पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड, बीट अंमलदार आर. एम. कोंढरे, उद्धव सातपुते आणि रशीद शहा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्रशरचे साईट इन्चार्ज सजनसिंग यादव आणि मशीन इन्चार्ज पियुष चतुर्वेदी यांना बोलावून शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली.

Jintur Farmers Protest Crusher Machine
Parbhani Crime | मानवतजवळ मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

यावेळी ज्ञानदेव तीर्थे, वानराजे तीर्थे, रुपेश तीर्थे, गजानन बन्सीभाऊ तीर्थे, बन्सी तीर्थे, मुंजाभाऊ तीर्थे, संतोष तीर्थे, गुलाब माकोडे, एकनाथ माकोडे, पंढरी माकोडे, जनार्दन माकोडे, ज्ञानोबा तीर्थे, रुस्तुमराव माकोडे, प्रभाकर माकोडे, सूर्यभान माकोडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. "धूर, धूळ आणि ब्लास्टिंगमुळे आमच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे क्रशर मशीन आणि डांबर प्लांट बंद करावेत," अशी मागणी त्यांनी केली.

चर्चेनंतर साईट इन्चार्ज सजनसिंग यादव यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, धूळ नियंत्रणासाठी दिवसातून तीन ते चार वेळा टँकरद्वारे पाणी फवारणी करण्यात येईल. लहान क्षमतेची मशीन बंद ठेवण्यात येईल आणि ब्लास्टिंगमधील दगड शेतात जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर क्रशर मशीन आणि डांबर प्लांट बंद करण्यात येतील, कारण आणखी केवळ दोन आठवडेच हे काम सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेत क्रशर मशीनचे गेट उघडले. साईट इन्चार्ज आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन तात्पुरता तोडगा निघाल्याने परिसरातील तणाव निवळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news