

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील एकरुखा गावात अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारत तब्बल 2 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली. घरातील व्यक्ती बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप व दरवाज्यावरील कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे एकरुखा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील वाढत्या घरफोड्यांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकरुखा येथील संभाजी हिरामण मोहिते यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने ते कुटुंबासह मुलीच्या इस्लामपूर (ता.पूर्णा) येथील सासरी गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून चोरीचा डाव आखल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दि.6 ते 7 जून दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्यावरील कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सर्व खोल्यांची झडती घेत कपाटातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
चोरट्यांनी सुमारे 1 लाख 92 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 20 हजारांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 12 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. विशेषतः बंद घरांवर लक्ष ठेवून चोरट्यांकडून गुन्हे घडत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
याप्रकरणी संभाजी मोहिते यांनी ताडकळस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली.