

Jintur Well Drowning Incident
चारठाणा : जिंतूर तालुक्यातील नवहती तांडा येथील १९ वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी घडली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणाचे नाव भारत प्रकाश राठोड (वय १९, रा. नवहती तांडा, ता. जिंतूर) असे आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भारत हा शेजारील काशीनाथ राठोड यांच्या नवहती शिवारातील शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. पाणी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत विश्वनाथ मन्ना राठोड (वय ६०, रा. वाधी, ता. जिंतूर) यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू नोंद नोंद करण्यात आली.
माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिंपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट पोलीस हवालदार कालवणे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या दुर्दैवी घटनेमुळे नवहती तांडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.