

पूर्णा: तालुक्यातील कानडखेड ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी आणि 'चिरीमिरी' न दिल्याने, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून ५६ पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून वगळल्याचा गंभीर आरोप सरपंचावर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गरजू लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी थेट प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
कानडखेड (क्रमांक १ व २) आणि कोल्हेवाडी या गावांचा समावेश असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीमधील ५६ कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या लाभार्थ्यांची घरे मातीची, कुडाची किंवा पत्र्याची असल्याने ते योजनेसाठी पात्र ठरले होते. मात्र, सरपंच आणि त्यांच्या प्रतिनिधीने १ मे २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेचा एक बनावट ठराव तयार करून ही सर्व नावे यादीतून वगळल्याचा आरोप आहे.
लाभार्थ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, "आमची घरे कच्ची असतानाही ती पक्की असल्याचे दाखवण्यात आले. केवळ राजकीय सूडबुद्धीने आमच्यावर हा अन्याय झाला आहे." या अन्यायाविरोधात गटविकास अधिकारी (BDO), तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागून आंदोलन करण्याचा इशाराही पीडित कुटुंबांनी दिला आहे.
सदस्य आणि ग्रामसेवकाचा ठरावाला आक्षेप या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले जेव्हा ग्रामपंचायतीच्याच सदस्यांनी या ठरावावर आक्षेप घेतला. ग्रामपंचायत सदस्य निलावती वैद्य, विजयमाला बारसे, विठ्ठल पारटकर आणि अशोक वाघमारे यांनी २२ ऑगस्ट २०२४ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘१ मे रोजी अशी कोणतीही ग्रामसभा झाली नाही किंवा कोणताही ठराव घेण्यात आला नाही. आम्हाला या ठरावाची काहीही माहिती नसून, आमच्या नावाचा आणि सह्यांचा गैरवापर करण्यात आला आहे.’ ग्रामसेवक अशोक खुपशे यांनीही २१ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून आपली सही खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. आपली सही स्कॅन करून ठरावावर वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कानडखेड क्रमांक १,२ व कोल्हेवाडी येथील जे लाभार्थी प्रधानमंत्री घरकूल योजनेतून वगळण्यात आली आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी यापुर्वी लाभ घेतला आहे.त्यांच्या कुटुंबात ट्रक्टर व ईतर सधनतेचे साधने आहेत. तसेच काहींच्या नावे जागा नाही.त्यामुळे असी नावे वगळण्यात आली आहेत.शिवाय,सदर घेतलेल्या ठरावावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनीच सह्या केल्या आहेत त्या खोट्या नाहीत.मी त्यांचा राजकीय द्वेष करत नसून विरोधकच जाणीवपूर्वक माझा राजकीय द्वेष करत आहेत.असे माझे ठाम मत आहे.
मारोतराव बखाल, महिला सरपंच पती तथा सरपंच प्रतिनिधी कानडखेड ग्रामपंचायत ता पूर्णा