

Purna Nephew killed by Uncle
पूर्णा: तालुक्यातील हिवरा (बु) येथे दारुचे व्यसन सोडावे, यासाठी काकाला उपदेश करणाऱ्या पुतण्याचा मनात राग धरुन चाकूने सपासप वार करीत निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२९) पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसांनी काकाला ताब्यात घेतले आहे. खून करण्यात आलेल्या मृत पुतण्याचे नाव स्वप्निल देविदास निवडुंगे (वय ३०,रा. हिवरा) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील हिवरा बु. येथे आरोपी (चुलता) दिगंबर सोपान निवडुंगे (वय ५०, रा.हिवरा यास पुतण्या मृत स्वप्निल निवडुंगे यांनी 'दारु का पिता, दारु सोडा समाजात आपली बदनामी होत आहे, असा उपदेश दिला होता. याचा राग अनावर होऊन काकाने पुतण्यास त्याचे घरी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाठून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पाडले.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील निवडुंगे याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील हा गावात किराणा दुकान चालवत होता आणि सिझनमध्ये साखर कारखाना येथे क्रेन ऑपरेटरचे काम करायचा.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, जमादार दत्ता काकडे, पोहेका मुंडे, हानवते यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे हिवरा गावात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.