

पूर्णा : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जुना मोंढा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री धाडसी घरफोडी केली. यात एका ज्वेलर्स दुकानाचे शटर वाकवून सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि एका किराणा दुकानातून २५ हजार रुपयांचा माल लंपास केला. या दोन्ही घटनांमध्ये एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, या घटनेने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जुना मोंढा भागातील महात्मा बसवेश्वर चौकात कैलास जगन्नाथ टाक यांच्या मालकीचे 'न्यू स्नेहल ज्वेलर्स' नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाजवळ प्रफुलकुमार संचेती यांचे किराणा दुकान आहे. रविवारी, २४ ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांची कुलुपे तोडून आणि शटर वाकवून आत प्रवेश केला.सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी दोन्ही दुकानदार नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता, त्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पूर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांकडून तातडीने तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही दुकानांची पाहणी करून पंचनामा केला. या चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड येथील पोलीस मुख्यालयातून श्वान पथक आणि परभणीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या दोन्ही पथकांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
याप्रकरणी दुकानदारांनी दिलेल्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन पाटील पुढील तपास करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.