

परभणी : शहरातील गंगाखेड नाक्यावरील उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. जिंतूर रोड, बसस्थानक रोड आणि गंगाखेड रोड या तिन्ही दिशांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने शेकडो वाहने कोंडीत अडकली होती. तब्बल पावणेदोन तास वाहनांची चाके जागेवरच थांबल्याने हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
विशेष म्हणजे, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची प्रभावी यंत्रणा रस्त्यावर दिसून आली नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे.
परभणी शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक व गंगाखेड नाका हा परिसर नेहमीच वर्दळीचा असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या भागात बेशिस्त वाहतुकीमुळे वारंवार कोंडी होत आहे. दररोजच्या या समस्येकडे संबंधित यंत्रणेकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावर वाहनांची कोंडी सुरू झाली. या चौकातून एकमेकांना ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांची चढाओढ सुरू झाली होती. वाहतुकीचे नियम पाळण्याऐवजी आधी पुढे जाण्याच्या प्रयत्नामुळे चौकात वाहनांचा गुंता निर्माण झाला. काही वेळातच जिंतूर रोड, बसस्थानक रोड आणि अनुसया टॉकीजमार्गे गंगाखेड रस्त्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या कोंडीत खासगी वाहने, एसटी बसेस, दुचाकींसह शेकडो वाहने अडकून पडली होती. पावणेदोन तासांहून अधिक काळ अनेक वाहनांना जागेवरून पुढे सरकताही आले नाही. त्यामुळे कामावरून घरी जाणारे नागरिक, प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांचे नियोजित कार्यक्रम विस्कळीत झाले. मात्र, या वाहतूक कोंडीचे नेमके कारण काय, याबाबत स्पष्टता नव्हती.
उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रभावी प्रयत्न करताना दिसून आले नाहीत. वाहतूक शाखेचे काही पोलीस कर्मचारी रेल्वेस्थानक परिसरात थांबलेले दिसले, मात्र उड्डाणपुलावरील कोंडी फोडण्यासाठी आवश्यक ती तत्परता दाखविण्यात आली नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. वाहतुकीचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण होऊनही पोलिस यंत्रणेची अनुपस्थिती जाणवल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.
वाहतूक कोंडी कायमची सोडविणार कोण?
गंगाखेड नाक्यावरील उड्डाणपूल, रेल्वेस्थानक आणि बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती, चौकातील वाहतुकीचे योग्य नियोजन, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. केवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा ती होऊच नये, यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परभणीकरांना दररोज वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.